सत्य सांगायलाच हवं 
Share!

Click to read original in English

(5 ऑक्टोबर 2019 ला इंग्रजीत लिहिले)

चार ऑक्टोबर 2018 रोजी रात्री उशीरा  मॉन्ट्रियल शहरातून वाहणाऱ्या  सेंट लॉरेन्स नदीत एक मृतदेह सापडल्याची बातमी काही वर्तमानपत्रांनी दिली होती. माझे पती आनंद अल्मेडा यांचा देह होता तो. आत्महत्यांच्या आकडेवारीबद्दल मला खूप बोलता येईल. दर 40 सेकंदाला जगात कुणी कुणी आत्महत्या करून स्वतःला संपवतच असते. पण प्रत्यक्ष तुमच्याच कुणाबाबत  किंवा ओळखीच्या कुणाबद्दल असे काही घडते  तेव्हाच ते काळजाला थेट भिडते

     28 सप्टेंबर 2018 रोजी  आनंद मला शेवटचा दिसला होता. तो बेपत्ता असल्याची तक्रार मी पोलिसात  लगेच नोंदवली होती. त्यानंतर  रोजच्या रोज मी पोलिसांशी संपर्क साधत होते. पण ऑक्टोबरच्या  5 तारखेला  पोलीस स्वतःच माझ्या घरी आले आणि  देह सापडल्याची बातमी त्यांनी मला दिली. इतका तणावपूर्ण आठवडा आणि इतका असह्य दिवस उभ्या आयुष्यात माझ्या वाट्याला कधी आला नव्हता

      आनंदच्या मृत्यूबद्दल लोक मलाच दोषी ठरवतील आणि त्याच्या मृत्यूमागची खरी कारणे सांगण्याचे  इतरही काही दुष्परिणाम घडू शकतील याची तमा बाळगता घडलं होतं  ते सारं मी प्रांजळपणे सांगितलंनातेवाईक, शेजारीपाजारी, परिचित यांच्याकडून मला  बसायचा तो फटका बसलाच. विशेषतः भारतातील माझ्या म्हणवणाऱ्या माणसांकडून. मनोविकारांबाबतची जाण  त्यांच्यात नव्हती हे एक कारण. दुसरे म्हणजेसारे कसे छान छान’  च्या देखाव्यालाच  त्यांच्या लेखी जास्त  महत्त्व होते

       देह मिळाल्यानंतर आठवड्याभराने  आनंदची अंत्यक्रिया   झाली. त्यापूर्वीच काही दिवस एक गोष्ट मी मनोमन ठरवली. मी चूप राहणार नाही अशी शपथच मी घेतली. आनंदचे जाणे मी वाया जाऊ देणार नाही. आनंदच्या कुमारवयापासूनच   नैराश्यरोगाशी ( depression) त्याचा संघर्ष सुरु होता. हा संघर्ष लपवायचा नाही. उलट जगापुढे तो मांडून त्या संघर्षाचा  मान ठेवायचा असा निर्धारच मी केला. मदतीचा टाहो फोडत असलेल्या प्रिय व्यक्तीला योग्य ती मदत देता केवळ प्रतिमा जपण्याच्या  भंपक बचावगिरीला  थारा द्यायचा नाहीजग काय म्हणेल याला मुळीच महत्त्व द्यायचे नाही असे मी ठरवूनच टाकले

          गोड गोड दाखवेगिरीचा हा हव्यास उत्तर अमेरिकेसह जगभरच्या  प्रवासी  भारतीय समुदायातही आपल्याला दिसतोच. आमचा जन्म भारतात झालेला नाहीलहानाचे मोठेही आम्ही बाहेरच झालोतरीही या दिखावाखोर प्रवृत्तीमुळे आमचं जगणं किती तापदायक बनत असतं याची साक्ष देशाबाहेर जन्मलेली आणि मोठी झालेली माझ्यासारखी प्रत्येक व्यक्ती देईल

कोत्या मनोवृत्तीच्या माणसांना  काय वाटेल  किंवा ती  काय म्हणतील यापेक्षा आनंदबरोबरची माझी जीवनकहाणी  इतरांच्या जीवनात काही बदल घडवून आणायला साहाय्यभूत ठरेल ही गोष्ट मला जास्त महत्त्वाची वाटते. ही कहाणी इतरांना हलवून  जागे करील. आपल्यातल्या अंतर्गत संघर्षांशी  एकाकीपणे लढणे मग त्यांना  भाग पडणार नाही. आमच्या कुटुंबियांना आणि  मित्रांना सोसाव्या  लागलेल्या  चिरवियोगाच्या जीवघेण्या यातना त्यांना भोगाव्या लागणाऱ्या नाहीत. आपण एकटेच अंधारकोठडीत कोंडलेले असून आपल्याला कुणाचाच आधार उरलेला नाही अशी तुमच्यापैकी कोणाची अवस्था झाली असेल तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही मुळीच एकटे नाही आहात. तुमच्यापैकी कुणाचं जवळचं माणूस आत्महत्या करुन तुम्हाला सोडून गेलं असेल तर माझं ऐका तुम्ही मुळीच एकटे नाही आहात. आपल्या गावातील हेल्प लाईनशी बोला. जवळच्या शोकमग्न लोकांच्या  परस्पर आधार गटाशी संपर्क साधा. समजून घेऊ शकेल अशी एखादी व्यक्ती तुम्हाला तिथे भेटल्याशिवाय राहणार नाही. किंवा आवश्यक ती आणखी मदत कुठून मिळू शकेल याचे मार्गदर्शन तिथे मिळेल. तुमच्या मानसिक अन्य गरजांकडे तिथे अधिक सहानुभूतीने लक्ष पुरवले जाईल. माझे समजूतदार  कुटुंबीय  आणि मित्रपरिवार यांच्या जोडीला समुपदेशन आणि हे आधार गट यांचा  आधार मला लाभला. त्यांच्यामुळेच दुःखातून बाहेर पडण्याचा माझा आजवरचा प्रवास सुकर झाला आहे. आजही चालूच असलेल्या  या प्रवासात पुढेही काही काळ याच  लोकांची तारक  सोबत मला मिळत राहणार आहे

आमची ही कहाणी ऐकून एक जरी जीव वाचला, एका जरी व्यक्तीचे दुःख थोडे हलके झाले तरी ती सांगितल्यामुळे लोकांकडून जे जे बोल मला सहन करावे  लागतील  ते सगळे कारणी लागले असे मला वाटेलमाझ्या जिवाचा जिवलग गमावण्याच्या ज्या यातना आहेत त्यापुढे ही निर्भत्सना ऐकण्याची  वेदना किरकोळ म्हणावी लागेलमाझ्या वाट्याला आला तसला  वियोग कुणाच्याही वाट्याला येऊ नये एव्हढीच माझी इच्छा आहे. जे जे खरे आहे ते आडपडदा ठेवता सांगून टाकणे हाच अशी शोकांतिका टाळण्याचा एकमेव मार्ग आहे. ही माझी जबाबदारी आहे. आज माझ्या विवेकाच्या आवाजापुढे माझा वृथाभिमान, माझा  अहंकार आणि माझी भीती यांची काही मातब्बरी राहिलेली नाही

    आनंदच्या आणि माझ्या जीवनात अनेक  सुखाचे क्षण आले. आम्ही एकमेकांच्या पाठीशी उभे रहात होतो. परस्परांचे स्थिर आधार होतो. पण नेहमीच काही त्याचं वागणं आणि त्याचा सहवास आनंददायी नसे. काही वेळा त्याचे निर्णय आत्मघातकी असत. आम्हा दोघांनाही त्याच्या  अशा वागण्याचा त्रास होई. शेवटपर्यंत होतच राहिला. एखादा माणूस आपल्या जीवनातील सर्वात  कठीण काळ भोगत असताना त्याला वाऱ्यावर सोडून देण्याचा सल्ला मी कुणाला देणार नाही. पण मी त्याला सोडले नाही म्हणून प्रत्येक व्यक्तीने तसेच करावे असाही सल्ला  मी कुणाला  कधी देणार नाही. आपल्याला  स्वतःलाच या साऱ्या गोष्टींमुळे वेड लागू नये म्हणून कुणी आपल्या जोडीदाराला अशा अवस्थेत सोडून गेलं तर त्या व्यक्तीला मी मुळीच कमी लेखणार नाही. मीच आनंदची सर्वकाळ  काळजी घेणारी सोबती असल्याने या साऱ्या परिस्थितीचा माझ्याही मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. तो असे काही करे, असे काही वागे की आता मी त्याला सोडून गेले तर ते मुळीच चुकीचे ठरणार नाही असे मला वाटे. मानसिक रुग्ण आणि त्याची काळजी घेणारी   सोबती अशा दोघांनाही योग्य मानसिक आधाराची सदैव गरज असते

     केवळ दक्षिण आशियायी समाजातच नव्हे तर जगभरच्या सर्व समुदायात मानसिक आजार आणि आत्महत्या हे चारचौघात उच्चारायचे निषिद्ध विषय मानले जातात. कलंकच. त्यामुळे कोणापुढे मन मोकळे करायचे, कुणाकडे मदत मागायची याची मला चोखंदळपणे निवड करावी लागे. आनंदच्या कुटुंबातील माणसे समजूतदार, मदतीला तत्पर आणि विवेकी वर्तन करणारी भली माणसे होती. प्रामाणिकपणा तर त्यांच्यात ओतप्रत भरलेला होता. पण आपल्या माणसाला काही मनॊविकार आहे हे मान्यच करायला ते तयार नव्हते. मग मात्र इतर माणसेही अशाच मताची असणार हे वास्तव मी स्वीकारले. आनंदचे काही मित्र पुढेमागे  एखाद्या नोकरीच्या ठिकाणी त्याची शिफारस करू शकत होते. त्यांना त्याच्या मनोविकाराबद्दल सांगून त्याला नोकरी मिळण्यात मी  बाधा आणू इच्छित नव्हते. कॅनडात आल्यावर नोकरी मिळवण्याचे  प्रयत्न हाच आनंदची चिंता आणि नैराश्य वाढवणारा मोठा घटक ठरला. इकडे आड तिकडे विहीर अशी दोन्ही बाजूंनी माझी कुचंबणा होऊ लागली

आनंदला यातून कसे बाहेर काढता येईल या एकाच विचारात मी गुरफटून गेले. त्याने योग्य वैद्यकीय मदत घ्यावी म्हणून मी त्याच्याशी युक्तिवाद करायचे, त्याच्या हातापाया पडायचेदोन वेगवेगळ्या वैवाहिक सल्लागारांकडे त्याला घेऊन जायचे. त्याच्यासाठी एक प्रशिक्षकही मी शोधून काढला. तो कॅनडात नव्याने आलेल्यांना आम्ही रहात होतो त्या क्युबेक प्रांतातील नोकरदार वर्गात सामावून जायला मदत करे. त्याला काम मिळवून द्यायला मदत करू शकेल अशा प्रत्येकाशी मी संपर्क साधायचे. नवागत स्थलांतरितांसाठी कोणकोणते कार्यक्रम आहेत याच्या शोधात रहायचे. आत्महत्या प्रतिबंधक हेल्प लाईनशी, पोलिसांशी, वैद्यकीय क्षेत्रातील सहयोगी व्यक्तींशी  बोलायचे. कुटुंबातील लोकांना सांगायचे. माझा एक आते भाऊ डॉक्टर आहे. घरी बोलावून  मी त्याला आनंदशी बोलायला लावले

इथे मॉन्ट्रियल मध्ये आत्महत्ये संदर्भात काम करणारी Suicide Action नावाची  एक संस्था आहे. तेथील वियोग समुपदेशक मला म्हणाला, “ हे बघ तू आनंदला मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलास. काही म्हणून कसर  ठेवली नाहीस. पण कुणी मदतीचा हात देत असेल तर आपलाही  हात पुढे करून तो स्वीकारण्याची जबाबदारी शेवटी ज्याची त्याचीच असते.”  सांगणं सोपं बाबा, करणं महाकठीण!

त्यावेळी माझ्यापाशी जे काही ज्ञान होतं त्याच्या आधारे  करता येईल तो सर्व  प्रयत्न मी केला याची मला खात्री आहे. प्रियजनाच्या आत्महत्येनंतर त्याच्या मागे राहिलेल्या अनेकांना एक प्रकारची अपराधी भावना छळत असते. अशी अपराधी भावना  आज माझ्या मनात बिल्कुल  नाही. पण राग मात्र येतोय मला. प्रचंड राग. लोक कसे आत्मसंतुष्ट असतात आणि जाणूनबुजून अडाणी बनतात याबद्दलचा राग. मला प्रामाणिकपणे वाटतं की  कोणी आपले मूल्यांकन, न्यायनिर्णयन  करेल अशी कुठलीच भीती मनाशी  बाळगता आपल्या गेलेल्या माणसांबद्दल आणि आपल्याला परिस्थितीशी  कराव्या लागलेल्या संघर्षांबद्दल अधिकाधिक लोकांना मोकळॆपणाने बोलता येईल अशी  सुरक्षित ठिकाणे उपलब्ध करून द्यायला हवीतआपले शरीर जसे आजारी पडते  तसे मनही आजारी पडू शकते ही समज त्यामुळे वाढेल. याविषयी अधिकाधिक जागृती होईल आणि समानुभूतीही वाढीस लागेल. त्यामुळे एकंदरीतच मनोविकाराभोवतीचा कलंक पूर्णतः नाहीसा होईल असे नव्हे पण तो कलंक पुसट व्हायला तरी नक्कीच मदत होईल. याहून महत्त्वाचे म्हणजे मनोरुग्ण आणि त्याच्या जवळच्यांच्या मनात मनोविकारासंबंधीची जी शरमेची भावना आहे ती  त्यामुळे बरीचशी कमी होईल. बोलून मन मोकळे करणे, कुटुंबाकडून, मित्रांकडून किंवा मानसिक आरोग्यसेवा देणाऱ्या व्यावसायिकांकडून मदत मागणे पीडित गरजवंताला  त्यामुळे अधिक सोपे जाईल. नैराश्य, चिंता किंवा अन्य मनोविकारपीडितांच्या मनातील  मदत मिळवण्याविषयीचा  संकोच  त्यामुळे कमी होईल

  ज्या कुटुंबातील एखाद्याने आत्महत्या केली  आहे त्यांना  त्याबद्दल शरम वाटू नये. लोक नावे ठेवतील या भीतीपोटी त्यांचा आवाज दाबला जाऊ नये. विशिष्ट व्यक्तीची किंवा कुटुंबाची, कोणत्या परिस्थितीतून ते जात आहेत, कशाकशाला त्यांना तोंड द्यावे लागत आहे या कशाचीच जाण नसताना चकाट्या पिटणाऱ्या, न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरणाऱ्या आणि नावे ठेवणाऱ्या  त्या कोत्या लोकांना, गावंढळ मूर्खांना शरम वाटली पाहिजे. अडाणीपणा, संकुचित दृष्टी आणि या असल्या लोकांचे वर्तन यामुळे इतरांच्या दुःखात भरच पडते. इतकेच नव्हे तर त्यामुळे  रुग्णांचे  भोग सरता सरत नाहीत आणि  मनोरुग्णतेचा कलंक अधिकच खोलवर रुजतो

 सुरुवातीला माझ्या सासरमाहेरच्या दोन्ही कुटुंबांनी आनंदचा मृत्यू हा अपघाती आहे असे सांगायची सूचना  मला केली. भारतात त्यांनी सर्वांना तसेच सांगितले होते. मी मात्र मॉन्ट्रियलमध्ये होणारा आनंदचा अंत्यविधी हा मानसिक आरोग्य आणि आत्महत्या  हा  विषय ऐरणीवर आणणारा मंच बनवायचा यावर ठाम होते. त्याबरोबरच आपला भारतीय समुदाय व्यक्तीवर दडपण आणून आपला आत्मसन्मान आपले  शिक्षण, व्यवसाय, पगार, संपत्ती, प्रतिष्ठा, उपाधी यावरच अवलंबून असल्याचे व्यक्तीच्या मनावर  कसे ठसवतो  याचीही तिथे चर्चा व्हावी असा माझा निश्चय होता

  हा निर्धार मी केला कारण आनंदच्या अंत्यविधीत मला स्वतःशी प्रतारणा करायची नव्हती. प्रामाणिक रहायचं होतं. टीकेला सामोरे जायची माझी तयारी होती. मला काही लपवाछपवी करायची नव्हतीखरंखुरं सगळं स्वच्छपणे मांडायचं होतं. यामुळे आता  झालंय असं की आपली  स्वतःची  किंवा आपल्या माणसांची  मनोविकाराशी, नैराश्य किंवा चिंतारोगाशी  चाललेली झुंज मोकळेपणाने सांगायला लोक आमच्याकडे येत आहेत. निःशंकपणे बोलता येईल असा सुरक्षित अवकाश  त्यांना आमच्या येथे लाभला आहे. काही जण तर असे म्हणाले की आपण आता मदत मागितलीच पाहिजे असा  सावधानतेचा इशारा त्यांना यामुळे मिळाला. आनंदच्या मृत्यूमुळे अनेकजण हादरून  गेले. ज्यांनी त्याला कधीच पाहिलं नव्हतं अशा  माझ्या जवळच्या  आणि लांबच्या मित्रांना सुद्धा त्याच्या आत्महत्येमुळे धक्का बसला

   आनंदच्या मृत्यूबाबत खुलेपणाने सगळे सांगून टाकल्यामुळे परस्परांबद्दल करुणा आणि समानुभूतीची एक लहर सर्वत्र पसरत गेली. एकाकडून दुसरीकडे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे खुल्या  आणि सच्च्या परस्परसंवादाचे  पर्व सुरु झाले. संबंधित विषयाची जागृती निर्माण करून समाजाच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने पडलेले हे केवळ एक पहिले पाऊल होय

संकोच, शरम किंवा भीती बाजूला सारून निश्चित उद्दिष्ट समोर ठेवून आपण आगेकूच करू या

     कृपया हे सर्वत्र शेअर करा. संवादाची ही साखळी पुढे पुढे जाऊ दे. मनोविकारावरचा कलंक पुसण्याच्या आणि इतरांना मदतीचा हात देण्याच्या माझ्या अंगिकृत कार्याला आपलाही हातभार लागू द्या.

धन्यवाद

शालिनी  तुस्कानो 

 ( मराठी भाषांतर : अनंत घोटगाळकर )

Marathi Translation by Anant Ghotgalkar

Instagram